Kantalyacha prasar hotoy lokaho.. bharun ale amhala..
Jai Maha-Kantala !!
कंटाळा? छे! छे! ;फुल्ल ‘टाइमपास’! |
‘शोभायात्रा’, ‘भूमितीचा फार्स’ यांसारखी ब्लॅक कॉमेडी ढंगातील तिरकस विनोदी नाटकं लिहिणारे (‘राहिले दूर घर माझे’ अपवाद!) नाटककार शफाअत खान यांनी १९७८ च्या सुमारास रूपारेल कॉलेजच्या मैदानावर भरलेल्या नाटय़संमेलनाच्या निमित्तानं ‘क’ या नावाचा दीर्घाक लिहिला होता. आयनेस्कोच्या ‘चेअर्स’ या नाटकाशी साधम्र्य सांगणारं हे नाटक! मात्र, तोवर शफाअत खान यांचा आयनेस्कोशी बिलकूलच परिचय नव्हता. परंतु ‘चेअर्स’वर आधारित एक नाटक रंगायनननं सादर केलं होतं आणि त्या नाटकाबद्दल दोन भिन्न टोकाची मतं व्यक्त झाली होती, असं शफाअत खान यांच्या कानावरून गेलं होतं. जीवनातल्या कंटाळ्याबद्दलचं हे नाटक महाबोअरिंग आहे, असं ते पाहणाऱ्या काहींचं म्हणणं होतं. तर काहींना त्यात काहीच वावगं वाटलं नव्हतं. कारण- कंटाळ्यावरचं नाटक कंटाळवाणेपणच मांडणार, त्यात गैर ते काय, असं त्यांचं म्हणणं होतं. या विषयाशी साधम्र्य सांगणारं, परंतु कंटाळ्याचा अजिबात कंटाळा येऊ न देता हा विषय विनोदाच्या अवगुंठनात सादर केला तर..? हा विचार त्याचवेळी शफाअत खान यांच्या मनात चमकून गेला. ‘कंटाळ्यावरचं नाटक आणि विनोदी? भलताच विनोद बुवा!’ असं कुणी यावर म्हणेलही; परंतु शफाअतरावांना मात्र ते तसंच मांडायचं होतं. म्हणून मग त्यांनी बैठक मारून साधारण सव्वा तासाचा ‘क’ हा दीर्घाक लिहिला. तो रूपारेलमधल्या नाटय़संमेलनात सादर झाला आणि प्रेक्षकांनी हास्याच्या प्रचंड गडगडाटात त्याला दिलखुलास दादही दिली. नंतर शफाअत खान यांनी आपल्या ग्रुपतर्फे रोहिणी हट्टंगडी आणि शशिकांत कारेकर यांना घेऊन या दीर्घाकाचे प्रश्नयोगिक रंगमंचावर आणखी १०-१२ प्रयोग केले. त्यांनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे तत्कालिन प्रथेप्रमाणे हे नाटक ‘यशस्वी’ होऊन काळाच्या पडद्याआड गेलं.
मध्यंतरी प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी कधीतरी एका एकांकिका महोत्सवात ‘क’चा प्रयोग पाहिला आणि याचं उत्तम दोन अंकी नाटक होऊ शकेल, असं मत त्यांनी शफाअत खान यांच्यापाशी व्यक्त केलं. परंतु शफाअतरावांना पुढे काही त्याचं पूर्णलांबीचं ‘नाटक’ दिसेना आणि तो विषय मग मागेच पडला.
२००२ साली प्रियदर्शन जाधव यांनी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या निमित्तानं ‘क’ एकांकिका स्वरूपात सादर केली. वीणा जामकर आणि अद्वैत दादरकर यांना घेऊन केलेल्या या एकांकिकेनं अनेक पुरस्कार पटकावले. अनेक स्पर्धा गाजविल्या. मात्र, त्यानं प्रियदर्शन जाधव यांचं समाधान झालं नाही. त्यांना या दीर्घाकात मोठय़ा नाटकाच्या शक्यता दडलेल्या दिसत होत्या. त्यांनी तसं शफाअत खान यांना सांगितलं व ‘मी त्यावर काम करू का?’ म्हणूनही विचारलं. शफाअतरावांनी त्यांना ‘क’वर काम करायची परवानगी दिली.
‘शफाअत खान यांनी परवानगी दिल्यावर मी या संहितेबद्दल मला वाटलेल्या शक्यता लिहून काढल्या. त्या नोट्सवर मग आमची बरीच चर्चा झाली. या नाटकातील काही संदर्भ काळानुरुप बाद झाले होते. काही तासून अधिक टोकदार करण्याची गरज होती. तसंच काही नव्या गोष्टी त्यात अंतर्भूत करणं गरजेचं होतं. अर्थात हे सगळं नाटकाच्या मूळ आशयाला जराही धक्का न लावता करावं लागणार होतं. त्यानुसार मग आम्ही पुन: पुन्हा संहितेत बदल करत गेलो. त्यावर उलटसुलट चर्चा केल्यावर काही गोष्टी नव्यानं सापडल्या. काही जुन्या संदर्भहीन ठरलेल्या गोष्टींना कात्री लावावी लागली. अशा तऱ्हेनं ‘टाइमपास’ची नाटय़संहिता वर्ष- दीड वर्षाच्या मेहनतीनंतर एकदाची सिद्ध झाली. माझं या नाटकावर काम चालू आहे, हे माझा निर्माता मित्र राहुल भंडारे याला ठाऊक होतं. एकदा बोलता बोलता सहज त्यानं ही गोष्ट ‘सुयोग’चे सुधीर भट यांच्या कानावर घातली. त्यांनी मग आम्हाला नाटकाचं वाचन करण्यासाठी बोलावलं. त्यांना नाटक पसंत पडलं आणि ते व्यावसायिक रंगमंचावर आणायचं ठरलं..’ दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी या नाटकाचा प्रवास सांगितला.
‘‘क’ हे नाटक माझ्या दृष्टीनं केव्हाच मागं पडलं होतं. परंतु प्रियदर्शनला त्यात फुललेन्ग्थ नाटकाची शक्यता दडलीय असं जेन्युइनली वाटत होतं. मग आम्ही दोघांनी त्यानं काढलेल्या नोट्सच्या आधारे त्यावर बरंच काम केलं. त्यातून अनेक नव्या गोष्टी अॅड झाल्या. जुन्या, अनावश्यक गोष्टींना कात्री लावावी लागली. अर्थात नाटकाचा फोकस बदलणार नाही, ही दक्षता घेऊनच हे करावं लागलं. तसं ते आता झालंय असं वाटतं. माणसाच्या आयुष्यातील कंटाळ्यावरचं हे नाटक प्रेक्षकांना जराही कंटाळा येणार नाही अशा प्रकारे सादर करायचं, हे एक मोठंच आव्हान आहे. प्रियदर्शनसारखा हरहुन्नरी, झोकून देऊन काम करणारा, बुद्धिमान तरुण दिग्दर्शक या नाटकाला न्याय देऊ शकेल असा मला विश्वास वाटला. त्यामुळेच हे नाटक त्याच्यावर सोपवताना मी निर्धास्त आहे..’ शफाअत खान सांगतात.
‘सुप्रिया पिळगावकर आणि भरत जाधव हे सध्याचे दोन बिझी कलाकार या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. ‘सही रे सही’नंतर भरतचं नवं नाटक आलेलं नाही. त्यामुळे त्याच्या नव्या नाटकाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असणं स्वाभाविकच आहे. आणि भरतही आपली प्रचलित प्रतिमा आणि विनोदाची ठरीव चाकोरी बाजूला सारून नव्यानं पूर्णपणे काहीतरी वेगळं करू बघतोय, ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. सुप्रियाच्या अभिनयक्षमतेबद्दल तर प्रश्नच नाही. तिनं ‘आम्ही दोघं राजा-राणी’ नाटकात ते सिद्धच केलेलं आहे. हे दोघंही नाटकावर खूप मेहनत घेताहेत. कलाकार तालमींत मोबाइल स्विच ऑफ करून फुल्ल कॉन्सन्ट्रेशनने भाग घेताहेत, असं माझ्या पाहण्यात अलीकडे दुर्मिळ झालेलं दृश्य ‘टाइमपास’च्या तालमींत आम्हाला पुन्हा अनुभवायला मिळतंय..’ निर्माते सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी संतुष्ट होऊन सांगत होते. ‘नवरा-बायकोच्या नात्यातसुद्धा काही काळानंतर एक प्रकारचं शिळेपण येतं. त्यांना परस्परांचा कंटाळा येतो. तो काही केल्या जाता जात नाही. मग तो घालविण्याच्या अट्टहासातून विविध युक्त्या-प्रयुक्त्या योजल्या जातात. त्या प्रयत्नांत ते दोघं जे जे काही करतात, त्यातून हे नाटक उभं राहिलंय. ‘टाइमपास’ हे नाटक कंटाळा या विषयावरचं असलं तरी त्यात एक क्षणही कंटाळा येत नाही. सतत हास्याचे धबधबे कोसळत राहतात. त्यातल्या गंभीर आशयाशी मात्र ते शेवटपर्यंत प्रश्नमाणिक राहतं, हेही तेवढंच खरंय..’ सुधीर भट आपली नेहमीची यशस्वी नाटकाची थिअरी बाजूला सारून सांगतात.
भरत जाधव या नावाचं कुतूहलमिश्रित आकर्षण, तसंच विनोदाचा सर्वस्वी वेगळा बाज हाताळणाऱ्या, दर्जाशी कुठल्याही बाबतीत तडजोड खपवून न घेणाऱ्या शफाअत खान या लेखकाचं आणि भरतचं एकत्र येणं, हे कॉम्बिनेशनच भन्नाट आहे. त्यातून पुन्हा अभिनयाचा दबदबा असलेली सुप्रियासारखी ताकदीची अभिनेत्री भरतसमोर उभी ठाकत आहे. त्यामुळे भरतला कसून मेहनत करण्यावाचून गत्यंतरच नाही. आणि तसा तो मन:पूर्वक कष्ट घेतो आहे, स्वत:ला बदलून नाटकाचा आशय समजून घेतो आहे. प्रियदर्शन जाधव यांच्यासारखा अभ्यासू दिग्दर्शक ‘टाइमपास’च्या निमित्तानं आपलं नाणं व्यावसायिक रंगभूमीवरही खणखणीतपणे वाजवू इच्छितो आहे. आणि या साऱ्यांच्या मागे सुयोगसारखी बडी संस्था दर्जेदार निर्मितीमूल्यांसह ठामपणे उभी आहे. उत्तम नाटक पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांना आणखी काय हवं?