Friday, March 4, 2011

कंटाळा आणि चकोर

Saujanya -

'कंटाळा आला आहे आज!' चकोरने आळोखे-पिळोखे देत जाहीर केलं.
चकोरी हे ऐकून हबकली. कारण चकोर घरी बसला तर तो नवनव्या फर्माइशी करण्याचा धोका असतो हे तिला अनुभवाने कळलं होतं.

'आराम हराम है!' ज्युनियर चकोरी पुटपुटली.

चकोरने ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्याने जोरदार जांभई दिली.

'पुढल्या महिन्यात र्वल्ड कप आहे.' चकोरीने त्याला आठवण करून दिली. तेव्हा तुमच्या दांड्या होतील, आता सीएल वगैरे संपवू नका.' मुलाने आईचा डायलॉग टाकला.

'सगळ्या मॅचेस संध्याकाळी होतील. दांडी मारायची गरज नाही.'

'रात्री जागून मॅचेस बघाल आणि झोप झाली नाही म्हणून दांडी माराल.' चकोरीने पूर्वानुभव सांगितला.

'डॅड, पण आज तुम्ही घरी बसून काय करणार?' मुलाने विचारलं.

'तुमचा अभ्यास घेणार. नोटबुक्स तपासणार.' चकोरने हसत हसत उत्तर दिलं.

'डॅड, तुम्ही दोघं पिक्चरला जा.' मुलीने सुचवलं.

'तितकाही उत्साह नाही. अगदी कंटाळा आला आहे.' चकोर खरोखर कंटाळलेला दिसला.

'डॅड, तुम्ही पत्ते खेळा.' मुलाने प्रस्ताव मांडला.

'त्यापेक्षा ताणून द्या.' मुलीने सुचवलं.

'मला वाटतं तुम्ही ऑफिसला जाणंच योग्य. नाहीतर घरी बसून ऑफिसला फोन करून गप्पा मारत बसाल.' चकोरीने त्याला ऑफिसला जाण्यास प्रवृत्त केलं.

'मी असं करतो की, मी काहीही फर्माइश करणार नाही. तू देशील ते खाईन. मग तर झालं!' चकोरने शरणागती पत्करली.

'अस्सं आता म्हणता. तुमचा काय भरंवसा.' चकोरीने अविश्वास दाखवला.

'डॅड, तुम्ही नक्की ऑफिसला नाही जाणार?' मुलाने विचारलं.

'का?' चकोरने संशयाने त्याच्याकडे बघितलं.

'म्हणजे आम्हाला त्यानुसार आमचे प्रोग्रॅम आखता येतील.' मुलीने जाहीर केलं.

चकोर त्यांच्याकडे बघतच बसला.

- चकोर

No comments: